पहाटे पहाटेचं प्रसन्न वातावरण किती प्रसन्न वाटतं, तो उगवणारा सूर्य जणू आपल्या आयुष्याचा जन्मच. सभोवताली मस्त तांबडं पसरतं जसं आपल्या भोवतालची लोकं आपल्या जन्माच्या वेळी आनंदित होतात. हळू हळू सूर्य तेजस्वी होत जातो जसं काही आपल्या बालपणी आपण शिक्षणाचे आणि संस्काराचे बाळकडू घेऊन स्वावलंबी होत जातो. दुपारभर तो सतत प्रखरतेने जळत असतो आणि जीवसृष्टीला कदाचित त्याच्या विश्व या कुटुंबाला पोसत असतो आणि आपणहि आपल्या तारुण्यात परिश्रम घेत असतो आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतो आणि त्यामुळे आपल्याला सर्व थरातून योग्य तो सन्मानहि भेटत असतो, आपले भौतिक जीवनही समृद्ध करत असतो पण त्यात आपण एवढे गुंतून जातो कि त्यातच आपले सुख सामावल्याची कल्पना करतो आणि पुरते फसतो. सकाळ, दुपार पर्यंत निसर्गाचं आणि आपलं जुळलं पण संध्याकाळ ?
हे काय पाहतोय मी ? संध्याकाळी देखील निसर्ग किती सालस वाटतोय, आगदी पहाटे सारखाच, तीच लाली सार्या आकाशात पसरलेली, तीच वार्याची मंद झुळझुळ, दुरून कुठून तरी येणारा तो पारिजातकाचा मनमोहक सुगंध आणि तो सूर्य.... तो जरा शांत वाटतोय, सकाळी जसा तो हळू हळू तळपत होता आणि ज्या आवेशात होता तो आता नाही. कदाचित दिवसभराच्या अनुभवाने तो चांगलाच प्रौढ झालाय. आणि आयुष्याचा खरा अर्थ काळाला. तो शांत आहे पण दुःखी मुळीच नाही कारण संध्याकाळीचं ते वातावरण आपल्याला चांगलं वाटतं आणि खिन्न वातावरण कधी मनाला भावत नसतं. कदाचित त्याने खरा सन्यास स्वीकारला आहे. तो स्वतः संपत चालला आहे या भावाने पेक्षा येणाऱ्या रात्रीच्या स्वागतास तो जास्त उत्सुक आहे. म्हणून ते वातावरण सुखावह वाटतं, त्यात द्वेष नाही, तक्रार नाही, इच्छा नाही, वासना नाही आणि दुःखही नाही. मग हा सुखानंद माणसाच्या जीवनसंध्येत का नाही ?
तसं पाहिल्यास त्याची तशी बरेच कारणे आहेत जसे कि आज काल ची नवी पिढी स्वकेंद्रित झाली आहे. आपल्या आई वडिलांकडे , पालकांकडे ते लक्ष देत नाहीत, त्यांची काळजी घेत नाहीत, त्यांच्यावर अन्याय करतात . निवृत्ती मुळे आधीसारखा मानसन्मान न मिळणे. हि सगळी कारणं नक्कीच प्रभाव टाकतात आणि त्यामुळे दुःखी होणं पण स्वाभाविक आहे पण त्यामुळे असंच कुंठीत जीवन जगायचं कि त्यावर उपाय शोधायचा ? आणि यात आपली पण एक चूक नक्की आहे हे पण प्रत्येक वृद्धाने शोधावे. खरं तर त्याचं उत्तर आधीच दिलेला आहे पण त्याचं कोणी गंभीर विचार करेल तर ना.
ब्राम्हचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थानाश्रम आणि संन्यासाश्रम हि चार आश्रम आपल्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे आहेत. पहिल्या दोन आश्रमांचे आपण तंतोतंत जरी नसले तरी पालन करतोच जसे पहिले आपण शिक्षण घेतो आणि लग्न करून अनेक जबाबदार्या पण नेटकेपानाने पार पाडतो पण नंतरचे दोन्ही आश्रम आपणास मान्य नसतात कारण. आपण नौकारीतून तर निवृत्ती स्वीकारतो पण घरातील मुख्य पद सुटत नाही. आपल्या इच्छा आकांक्षा तेवढ्याच आणि तितक्याच तीव्र असतात. आपला अहंकार यत्किन्चितही कमी होत नाही. आणि अपेक्षांचा आलेख खाली होण्यापेक्षा उंचच उंच वाढत जातो. हे सगळं त्यागणे सोपं नसलं तरी हि अवघड हि नाही फक्त गरज आहे ती ज्ञानार्जनासाठी डोक्याची दारे उघडे ठेवण्याची आणि खरे सुख कशात आहे समजण्याची. त्याग, सन्यास ह्या गोष्टी प्रथमतः कठीण वाटतात पण एकदा अनुभव घेतला कि त्याच सुख देतात. आणि जीवन आनंदी बनवतात. आपलं सर्वस्व प्रामाणिकपणे ईश्वरास अर्पण करा, आपले वृद्धत्व हा एक भोग मानण्या पेक्षा देवाजवळ राहण्याची संधी मानून बघा,बघा कसं वाटते ते.
मला कुणाला तत्त्वज्ञान शिकवायचं नाही पण संध्यासमय सुखी व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे. कारण त्यागातील खरा आनंद याच काळात खर्या अर्थाने उपभोगता येतो. शेवटी आपले जीवन सुखी करणे हे आपल्याच हातात असते. आनंद मानण्यात असतो हे अजून वेगळे काय सांगावे ?
जागतिक वृद्ध दिनाच्या लाख लाख शुभेच्छा !
No comments:
Post a Comment